Wednesday, July 9, 2014

असती का ऐसे कुणी?



         
बहुत असती जे यशाचे मिरविती माथी तुरे 
वैभवाची शीग चढता म्हणती न केव्हा पुरे 
यश सुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळूनी 
मुक्त झाले जीवनी या , असती का ऐसे कुणी ?

रेखिल्या परिघात ज्यांची रमुनी गेली मनमती 
बहुत ऐसे घरकुलांच्या सुखद स्वप्नी रंगती 
होऊनी निसंग परी जे, श्रमती विजनी काननी 
हिंदुराष्ट्रा जे समर्पित , असती का ऐसे कुणी ?

शिंपिती फुलबाग  कोणी शिंपिती वन वैभवे 
शिंपिती कोणी फुलांचे गंध भरले ताटवे 
बांधवांच्या आर्त हृदयी मेघसे ओसंडूनी 
शिंपिती जे प्रेम आपुले, असती का ऐसे कुणी?

उजळिती कोणी पसा अन उजळिती अंगण कुणी 
उजळिती देवालये अन उजळिती नगरे कुणी 
त्रिभुवनाला उजळणारे प्रखर ते तेजोमणी 
प्राणदायी ते प्रचोदक , असती का ऐसे कुणी ? 

No comments:

Post a Comment