Wednesday, July 9, 2014

असती का ऐसे कुणी?



         
बहुत असती जे यशाचे मिरविती माथी तुरे 
वैभवाची शीग चढता म्हणती न केव्हा पुरे 
यश सुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळूनी 
मुक्त झाले जीवनी या , असती का ऐसे कुणी ?

रेखिल्या परिघात ज्यांची रमुनी गेली मनमती 
बहुत ऐसे घरकुलांच्या सुखद स्वप्नी रंगती 
होऊनी निसंग परी जे, श्रमती विजनी काननी 
हिंदुराष्ट्रा जे समर्पित , असती का ऐसे कुणी ?

शिंपिती फुलबाग  कोणी शिंपिती वन वैभवे 
शिंपिती कोणी फुलांचे गंध भरले ताटवे 
बांधवांच्या आर्त हृदयी मेघसे ओसंडूनी 
शिंपिती जे प्रेम आपुले, असती का ऐसे कुणी?

उजळिती कोणी पसा अन उजळिती अंगण कुणी 
उजळिती देवालये अन उजळिती नगरे कुणी 
त्रिभुवनाला उजळणारे प्रखर ते तेजोमणी 
प्राणदायी ते प्रचोदक , असती का ऐसे कुणी ? 

Thursday, September 6, 2012

पुन्हा एकदा .....

मित्र हो , 

आज पासून पुन्हा एकदा कः तरी लिहाव, या विचाराने उचल खाल्ली आहे.
तेव्हा किमान या पत्रा पासून सुरुवात करावी अस वाटल.

काही दिवसांपूर्वी मी बद्रीनाथ आणि केदारनाथ या ठिकाणी जाऊन आलो, आणि तिथले अनुभव खरंच अवर्णनीय होते. काही जणांशी हे अनुभव शेयर करायचा योग आला, आणि सगळ्यांनी सांगितलं कि तू हे अनुभव लिहून काढ, आणि मग विचारांचा सिलसिला सुरु झाला.....

मी काही तुम्हाला बोअर करणार नाहीये, पण मी पाहिलेल्या ठिकाणांना तुम्हाला पण घेऊन जाव असा मला वाटत, तर अधे मध्ये आपण फिरून येऊ कुठे तरी, अर्थात तुमची हरकत नसेल तरच....

असो, सध्या कन्याकुमारी दौरा करायची तयारी सुरु आहे.....

.
 भेटू लवकरच....


धन्यवाद ...... 

Thursday, August 4, 2011

Grand आजी !!!!!!!!!

मी खूप लहान असतानाचा प्रसंग आठवायचा प्रयत्न केला तर मला आजी सोबत असलेलाच प्रसंग आठवतो. तसा मी कळायला लागल्यापासून मला आजीचाच लळा जास्त. तसं माझ्यावर सगळे खूप प्रेम करायचे, आई, बाबा, मामा, काका, काकू, इतर लहान मोठी भावंड, पण मला आजी जास्त आवडायची. त्याला २ कारण असू शकतील, एक तर मी लहान असल्यापासून तिच्या जवळच असायचो , आणि मला लहान असताना गोरी आणि नीट नेटकी राहणारी माणस जास्त आवडायची, त्यामुळे पण असेल. पण आत्ता मला जाणवतंय, माझ विश्व आजीभोवती विणल गेलं होत.
तसं आजीच मी दुसर नातवंड. आणि आता एकुणात आम्ही तिची ५ नातवंड, पण मला असा वाटत कि तिचा माझ्या वर जरा जास्त जीव, म्हणजे तीन कधी आमच्यात भेदभाव केला नाही, तरी पण मला असं वाटत.
मला कळतंय तेव्हा पसून मी बघतोय, ते आत्ता पर्यंत, बघेल तेव्हा ती कामात असते.आपल्या कामातून वेळ काढून ती घराचा आणि स्वतःचा व्यवस्थितपणा जपत असते, आणि आता तिला सुना आल्यात , पण पूर्वी जेव्हा ती अख्या घरात एकटी बाई होती, बाकी सगळे टोणगे, तेव्हा सुद्धा ती सगळ आवरून, प्रेस मध्ये काम करू लागत असे, आणि या सगळ्यातच तीन , म्हणजे आजी - आजोबा दोघांनीही असंख्य माणस जोडली. जोडली म्हणजे इतकी कि आजतागायत हि सगळी माणस आजी-आजोबांचं नाव काढलं कि गदगदून जातात.
आजीला सगळी जण ताई म्हणतात, आणि आजोबा आणि तिच्या पेक्षा मोठे लोक तिला सुमे ( तसं तीच नाव सुमन आहे) म्हणत असत, म्हणून आम्ही नातवंड तिला सुमी आजी म्हणतो. मला पहिला प्रसंग आठवतोय, मी बहुतेक बालवाडी मध्ये असेन तेव्हा, जानेवारी महिना असणार, आमच्या पाध्येवाड्यातल्या माजघरात आम्ही झोपायचो, पाहते मला जाग आली आणि शेजारी आजी नव्हती, तर मी उठून स्वयंपाक घरात गेलो, तिथे आजी एका कोपऱ्यात स्टोव्ह वर हलवा करत बसली होती. अंगावर फिकट गुलाबी रंगाची साडी, शांत चेहरा, मंद आचेवर हलवा फुलत होता. मी गेल्यावर आजीन मला पटकन मांडीवर घेतलं. आणि मग थोड्या वेलन हलवा बरणीत भरून ठेवला, आणि माझं तोंड धुवून दुध प्यायला दिलं.
त्यानंतर ची आठवण म्हणजे, तिचं एक मोठ ऑपरेशन झालं होत.मी तेव्हा ६ वर्षांचा होतो. आणि ऑपरेशन आहे म्हणून मला आजोळी ठेवलं होत. २ दिवसानंतर मला आजीला बघायला नेल होत, तेव्हा तिच्या नका तोंडात नळ्या आणि सलाईन बघून मी खूप रडलो होतो, मला अजूनही आठवतोय तो प्रसंग. माझ्या प्रत्येक आजारपणात अजून हि मला तीच लागते. अजूनहि जेवताना तिच्या हाताची आमटी, पुरणपोळी, गुळपोळी यांची चव इतर कशाला नाही असं वाटत. जरी माझी आई हे सगळे पदार्थ खूप सुंदर करत असली तरी सुद्धा. आम्हाला सगळ्यांनाच ती कोणत्याही कारणाशिवाय आवडते.
तसं बघायला गेलं तर ती देवा धर्माचं,सण-वार,परंपरा सगळ एकदम व्यवस्थित करणार. म्हणजे अगदी साग्रसंगीत. पण दुसरी कडे कोक, आईस्क्रीम यासागाल्यावर भारी प्रेम. पत्ते, सिनेमे, मैत्रिणी या विश्वात पण ती रमती. १० वर्षांपूर्वी, म्हणजे तिच्या वयाच्या ६५ नंतर, तिने माझ्या सोबत मुंबई पुणे प्रवास रेल्वे च्या दारात बसून केला होता. तिचे एकेक किस्से आठवायला लागलो कि मीच आवक होऊन जातो.
लहान असताना घरात काही विशेष पदार्थ केला कि एका डब्यात घालून मला ती चंदी कड पाठवायची. हि चंदी म्हणजे आजीची मामे बहिण. तीच नाव चंद्रकला. ती मी लहान असताना मला कडेवर घेऊन मारुतीला न्यायाची आणि तिथे खडीसाखर द्यायची, म्हणून मी तिला खडीसाखरेची आजी म्हणायचो. घरात काहीही केल कि एक डबा या आजी कड, आणि हि आजी पण फणस, खवा, घरच दुध असं काही बाही पाठवत रहायची. खर तर त्यावेळी या देण्या घेण्याचा खूप कंटाळा यायचा, कारण नाचकाम आम्हाला करायला लागायचं. पण आज चंद्रकला मावशी नसली तरी अजीबद्दलच प्रेम पुढच्या पिढीत पण तसच राहील आहे.
ती जशी आजी म्हणून आम्हा सगळ्यांची लाडकी आहे तशीच ती ज्यांची मामी, आत्या, आई, सासू, मावशी, मैत्रीण, बहिण, पणजी आहे, त्यांची पण ती तितकीच लाडकी आहे. हि सगळी रक्ताची नाती झाली, पण इतर जोडलेली माणस पण तिच्यावर जीवापाड प्रेम करतात, आणि याच एकाच कारण म्हणजे तीन सगळ्यांवर अगदी जीवापाड प्रेम केल, अगदी कोणत्याही कारण शिवाय. तीन सर्वांशी जे काही बंध निर्माण केले आहेत , ते खरच अतूट आहेत.

Wednesday, August 3, 2011

ओळख पटली ज्यास स्वतःची........

आज दहावीच्या result वर विद्यार्थ्याची पुढची दिशा ठरवली जाते. त्यामध्ये पलाकांसोबत तय विद्यार्थ्याचाही तेवढाच सहभाग असतो. लहान असल्यापासून आपल्यावर नकळत फ़क्त पैसे मिळवायचे संस्कार होतात. आणि त्याची परिणीती १० वी ला पुष्कळ मार्क मिळवून सायन्स ला प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनियर होणे या उद्देशात होते. आजकाल या दोन शाखांमध्ये सुद्धा वैविध्य आलंय, तरी पण कोणीही वेगळा, किंबहुना आपल्या आवडीचा मार्ग चोखाळताना दिसत नाही. असा का आहे? लोक आजकाल भौतिक सुखाच्या माग का लागलेत? या प्रश्नांची उत्तर शोधण तसं अवघडच आहे म्हणा, पण आपण स्वतः सुद्धा थोडा विचार केला, आपल्या स्वतःच्या बद्दल तर आपण करतोय ते काम आपल्या आवडीच आहे का?
एक गोष्ट आपण मान्य करू, कि पैसे मिळवण्यासाठी सर्वांनाच आवडीच काम करायला मिळत असं नाही, परंतु पैसे मिळवण्यासाठी काम करत असताना , स्वतःच्या आवडीच काम दिवसात थोडा वेळ तरी करायला मिळत का? ...या प्रश्नाचं उत्तर ९०% लोकांकडून नाही असाच येईल.... काय कारण आहे बर याच?
मला वाटतंय आपण आपल्या आत मध्ये डोकावून पाहतच नाही आहोत. आपली unique ability काय आहे याची जाणीव आपण करूनच घेत नाही आहोत. कारण एकदा का आपल्याला आपल्या आवडीच काम
कोणत आहे ते समजल कि आपण ते आपोआप मन लाऊन करायला लागतो. त्या कामाबद्दलचे विविध कंगोरे आपल्याला स्पष्ट होऊ लागतात, आणि मग आपण आपल्या मनाने त्याला जास्त वेळ देऊ लागतो. ते काम आपण पैसे कामावाचे म्हणून नव्हे तर आपल्या समाधानासाठी करत राहतो, पैसे हा त्या कामा मधला एक bi product असतो. पण आपण स्वतःच्या मनाला अंतर्मुख होण्याची संधीच नाही देत आहोत. जर दिवसातला काही काल आपण स्वतःसाठी दिला तर मला वाटत आपण स्वतःला स्वतःबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकू.
आजकाल लोक डिप्रेशन मध्ये जातात याच कारण स्वतःबद्दल च अज्ञान. आणि मला वाटतंय जर आपल्याला आपण काय आहोत, कोण आहोत हे समजल तर आपल्या जन्माचं सार्थक होईल. ज्ञानेश्वर माउली सुद्धा म्हणतात ' अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले '
नागपूरचे प्रसिद्ध कवी बोबडे लिहितात,

सागर पोहत बाहूबलाने; नाव त्यास मिळो मिळो रे|
स्वयेच जो तेजोनिधी तरणी; तदगृही दीप जळो न जळो रे|
जो करी कर्म अहेतू ,निरंतर; वेड त्यास मिळो न मिळो रे |
ओळख पटली ज्यास स्वतःची; देव त्यास कळो न कळो रे||

मनाला अंतर्मुख होण्याची सवय लागली कि हळू हळू सर्व प्रश्न सुटत जातील, आपली जाणीव पक्की होऊ लागते कि आपल्याला काय करायचं आहे. किंबहुना आपल्याला काय करायचं नाही हे जरी पक्का झाल तरी आपला बराचसा मार्ग सुकर होऊन जाईल.
मी स्वतःवरून सांगतो; ते बरोबर आहे कि चूक ते मला नाही माहित; पण ' काय करायचं ते मला समजल नसेल कदाचित, पण जे करायचं नाही ते नाकारण्याच धाडस मी दाखवलय'....

Tuesday, August 2, 2011

आठवणींचे ढग

आज मुंबई मधून नाशिक ला येण्यासाठी दुपारच्या जनशताब्दी एक्स्प्रेस ने मी निघालो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गाडीला जास्त गर्दी नव्हती ,त्यात मी आरक्षण केलेलं असल्यामुळे तसा निवांतच होतो. गाडी दादर ला आली , मी मस्त पैकी जागेवर जाऊन बसलो. शेजारी कोणीही नव्हत, आणि पुढे येणार हि नव्हत , त्यामुळे गप्पा होणार नव्हत्या. हातात पु.ल. एक साठवण होत , आणि मोबाईल मध्ये 'सहेला रे' होत. सगळ कसं जुळून आलं होत. बाहेर पाऊस पडतोय, मध्येच जोर वाढून मधेच कमी होत होता....आजूबाजूला हिरवळ होती, चक्क मुंबई मध्ये सुद्धा....
गाडीन ठाणे सोडलं आणि मग मी पुस्तक उघडल ....अंतू बरवा वाचत होतो...ते संपता संपता कसारा जवळ आलं, समोर डोंगरावर ढग दिसायला लागले. अंतू बरवा वाचून संपला होता, पान पालटलं तर समोर नंदा प्रधान. ... गम्मत कशी असते, हि सगळी माणस त्या त्या नावान जरी नसली तरी अन्य काही नावानं आपल्या आयुष्यात येऊन गेलेली असतात.... आणि नंदा समोर आल्यावर मन झप्पकन भूतकाळात पाठीमागे जाऊ लागलं. भेटलेले लोक, त्यांच्याशी विणलेले धागे, जुळलेले सूर , सगळ्या आठवणी ताज्या होऊन समोर येऊ लागल्या. गाडी घाटात वर गेलेली होती, आणि मगाशी डोंगरावर असलेले ढग आता गाडीच्या जवळून जात होते , आणि गाडीत आतमध्ये हे आठवणींचे ढग एकामागून एक येत होते.
काही वेळेला आशा आठवणी मनाला व्याकूळ करून जातात, थोडा त्रास देतात, ज्यांना मनाच उन्मन करायचं आहे, त्यांच्या साठी आठवणींच आशा प्रकारे त्रास देण योग्य नाही. पण जर आपण या आठवणींकडे रसिकतेन पहावं. मात्र त्यातच गुंतून पडू नये; अन्यथा आपली अध्यात्मिक प्रगती थांबेल. ' आपली जीवन कमलाप्रमाणे असाव' असा म्हणल जात.कमाल पाण्यात-चिखलात उगवत, त्यातच त्याचं पोषण होत. पण तरीही ते त्यान लिप्त होत नाही. माणसान संसारात या प्रमाणे असाव.
आठवणी आणि स्वप्नांचे ढग हे कायम आपल्यासोबत असणारच, त्यांची उपेक्षा न करता आणि आसक्ती न ठेवता सर्व गोष्टींचा समतोल साधून आपली नौका पैलतीरी न्यावी.

Saturday, July 30, 2011

Everyone in this world , born with unique ability.....

मी पूर्वी लोकांची खूप समीक्षा करत असे, हा असाच आहे, तो तसाच आहे, याला गणित येत नाही त्याला इंग्रजी येत नाही , आणि आशा लोकांना माझ्या लेखी काहीच किंमत नसायची .... मी माझ्याच जगात वावरत असायचो , स्वताला फारच शहाणा समजायचो. पण शिक्षणासाठी मुंबई ला आलो आणि मग स्वताबाद्दलाच्या सगळ्या समजुती दूर व्हायला सुरुवात झाली.
सर्वात प्रथम आपण म्हणजे सर्वज्ञ हा भाव निघून गेला, या जगात आपल्या पेक्षा कितीतरी शहाणी माणस आहेत, किंबहुना ती आपल्याच अवती भवती वावरत आहेत हे दिसायला सुरुवात झाली , आणि खऱ्या अर्थाने माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली .... खूप लोकांकडून, मित्रांकडून मी खूप काही शिकत गेलो , त्यापैकी एक म्हणजे मुंबई चे मनोज कोटक ....
आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांच्या बरोबर गप्पा मारण्याचा योग आला तेव्हा तेव्हा मला माझ्या आयुष्यासाठी काहीतरी महत्वाचा विचार मिळाला आहे. काल त्यांच्या बरोबर कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करण्याचा योग आला , आणि पुन्हा एकदा मी एक खूप मोठी शिदोरी, एक विचार घेऊन मुंबई मध्ये पाय ठेवला. काय विचार आहे तो? या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव एक unique ability घेऊन जन्माला येत असतो. तो जो गुण आहे तो इतर कोणाकडे नसतो, फक्त आपलं काम एवढच आहे, स्वतामधला तो गुण शोधण्याच , आणि त्याचं बरोबर समोरच्या व्यक्ती मध्ये सुद्धा असा काही गुण आहे हे ध्यानात ठेऊन त्याला कमी न लेखण्याच.
एखाद्या माणसाला समजा शिस्त नसेल, त्याच्या वस्तू इतस्ततः पसरलेल्या असतील, पण त्याच्या कडे एखादा विषय दुसऱ्याला समजून सांगण्याची उत्तम क्षमता असेल तर आपण त्या क्षमते कडे पहिले पाहिजे , आणि त्याचा आदर केला पाहिजे ना कि त्याच्या बेशिस्तपणा बद्दल त्याला शिव्या घालाव्यात.
या विषयाला खूप कंगोरे आहेत, मी माझ्या दृष्टिन महत्वाचा असा एकच मुद्दा मी इथे मांडायचा प्रयत्न केलाय..... पण कसं आहे, लिखाण हि काही माझी unique ability नाही, त्यामुळे काय लिहिलं आहे ते तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे .....

Thursday, July 28, 2011

पुलंचे एक प्रेरणादायी पत्र, १० जुलै १९५७,

प्रिय चंदू,
रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो.
मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९:३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे. तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत.
हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच. तू तुझ्या पत्रात अखिल जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही. तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!
तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे. तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे.
नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो. हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का? जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable? माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो. कळावे, भाई