Thursday, August 4, 2011

Grand आजी !!!!!!!!!

मी खूप लहान असतानाचा प्रसंग आठवायचा प्रयत्न केला तर मला आजी सोबत असलेलाच प्रसंग आठवतो. तसा मी कळायला लागल्यापासून मला आजीचाच लळा जास्त. तसं माझ्यावर सगळे खूप प्रेम करायचे, आई, बाबा, मामा, काका, काकू, इतर लहान मोठी भावंड, पण मला आजी जास्त आवडायची. त्याला २ कारण असू शकतील, एक तर मी लहान असल्यापासून तिच्या जवळच असायचो , आणि मला लहान असताना गोरी आणि नीट नेटकी राहणारी माणस जास्त आवडायची, त्यामुळे पण असेल. पण आत्ता मला जाणवतंय, माझ विश्व आजीभोवती विणल गेलं होत.
तसं आजीच मी दुसर नातवंड. आणि आता एकुणात आम्ही तिची ५ नातवंड, पण मला असा वाटत कि तिचा माझ्या वर जरा जास्त जीव, म्हणजे तीन कधी आमच्यात भेदभाव केला नाही, तरी पण मला असं वाटत.
मला कळतंय तेव्हा पसून मी बघतोय, ते आत्ता पर्यंत, बघेल तेव्हा ती कामात असते.आपल्या कामातून वेळ काढून ती घराचा आणि स्वतःचा व्यवस्थितपणा जपत असते, आणि आता तिला सुना आल्यात , पण पूर्वी जेव्हा ती अख्या घरात एकटी बाई होती, बाकी सगळे टोणगे, तेव्हा सुद्धा ती सगळ आवरून, प्रेस मध्ये काम करू लागत असे, आणि या सगळ्यातच तीन , म्हणजे आजी - आजोबा दोघांनीही असंख्य माणस जोडली. जोडली म्हणजे इतकी कि आजतागायत हि सगळी माणस आजी-आजोबांचं नाव काढलं कि गदगदून जातात.
आजीला सगळी जण ताई म्हणतात, आणि आजोबा आणि तिच्या पेक्षा मोठे लोक तिला सुमे ( तसं तीच नाव सुमन आहे) म्हणत असत, म्हणून आम्ही नातवंड तिला सुमी आजी म्हणतो. मला पहिला प्रसंग आठवतोय, मी बहुतेक बालवाडी मध्ये असेन तेव्हा, जानेवारी महिना असणार, आमच्या पाध्येवाड्यातल्या माजघरात आम्ही झोपायचो, पाहते मला जाग आली आणि शेजारी आजी नव्हती, तर मी उठून स्वयंपाक घरात गेलो, तिथे आजी एका कोपऱ्यात स्टोव्ह वर हलवा करत बसली होती. अंगावर फिकट गुलाबी रंगाची साडी, शांत चेहरा, मंद आचेवर हलवा फुलत होता. मी गेल्यावर आजीन मला पटकन मांडीवर घेतलं. आणि मग थोड्या वेलन हलवा बरणीत भरून ठेवला, आणि माझं तोंड धुवून दुध प्यायला दिलं.
त्यानंतर ची आठवण म्हणजे, तिचं एक मोठ ऑपरेशन झालं होत.मी तेव्हा ६ वर्षांचा होतो. आणि ऑपरेशन आहे म्हणून मला आजोळी ठेवलं होत. २ दिवसानंतर मला आजीला बघायला नेल होत, तेव्हा तिच्या नका तोंडात नळ्या आणि सलाईन बघून मी खूप रडलो होतो, मला अजूनही आठवतोय तो प्रसंग. माझ्या प्रत्येक आजारपणात अजून हि मला तीच लागते. अजूनहि जेवताना तिच्या हाताची आमटी, पुरणपोळी, गुळपोळी यांची चव इतर कशाला नाही असं वाटत. जरी माझी आई हे सगळे पदार्थ खूप सुंदर करत असली तरी सुद्धा. आम्हाला सगळ्यांनाच ती कोणत्याही कारणाशिवाय आवडते.
तसं बघायला गेलं तर ती देवा धर्माचं,सण-वार,परंपरा सगळ एकदम व्यवस्थित करणार. म्हणजे अगदी साग्रसंगीत. पण दुसरी कडे कोक, आईस्क्रीम यासागाल्यावर भारी प्रेम. पत्ते, सिनेमे, मैत्रिणी या विश्वात पण ती रमती. १० वर्षांपूर्वी, म्हणजे तिच्या वयाच्या ६५ नंतर, तिने माझ्या सोबत मुंबई पुणे प्रवास रेल्वे च्या दारात बसून केला होता. तिचे एकेक किस्से आठवायला लागलो कि मीच आवक होऊन जातो.
लहान असताना घरात काही विशेष पदार्थ केला कि एका डब्यात घालून मला ती चंदी कड पाठवायची. हि चंदी म्हणजे आजीची मामे बहिण. तीच नाव चंद्रकला. ती मी लहान असताना मला कडेवर घेऊन मारुतीला न्यायाची आणि तिथे खडीसाखर द्यायची, म्हणून मी तिला खडीसाखरेची आजी म्हणायचो. घरात काहीही केल कि एक डबा या आजी कड, आणि हि आजी पण फणस, खवा, घरच दुध असं काही बाही पाठवत रहायची. खर तर त्यावेळी या देण्या घेण्याचा खूप कंटाळा यायचा, कारण नाचकाम आम्हाला करायला लागायचं. पण आज चंद्रकला मावशी नसली तरी अजीबद्दलच प्रेम पुढच्या पिढीत पण तसच राहील आहे.
ती जशी आजी म्हणून आम्हा सगळ्यांची लाडकी आहे तशीच ती ज्यांची मामी, आत्या, आई, सासू, मावशी, मैत्रीण, बहिण, पणजी आहे, त्यांची पण ती तितकीच लाडकी आहे. हि सगळी रक्ताची नाती झाली, पण इतर जोडलेली माणस पण तिच्यावर जीवापाड प्रेम करतात, आणि याच एकाच कारण म्हणजे तीन सगळ्यांवर अगदी जीवापाड प्रेम केल, अगदी कोणत्याही कारण शिवाय. तीन सर्वांशी जे काही बंध निर्माण केले आहेत , ते खरच अतूट आहेत.

2 comments:

  1. छानच लिहिलय ,आज्जी आणि आज्जीच्या गोष्टींशिवाय बालपणाची मजाच नाही

    ReplyDelete